सातारा : सातारा जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त जीएसटी भरणा केल्याबद्दल किसन वीर साखर कारखान्याला राज्य सरकारकडून वस्तू व सेवा कर विभागाचा सर्वोत्कृष्ट करदाता म्हणजेच टॉप टॅक्स पेअर पुरस्कार मिळाला आहे. कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व कामगारांच्या हिताकरिता सूत्रे घेत मदत व पुनर्वसन मंत्री व कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष खासदार नितीन पाटील व उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळाने संस्थेच्या बाबतीत कठोर निर्णय घेत, व्यवस्थापनात आमूलाग्र सुधारणा केल्या आणि एक स्पष्ट, भविष्यमुख आराखडा तयार केला. त्यातून मिळालेल्या या पुरस्कारामुळे कारखान्याच्या पारदर्शक कारभाराचा, आर्थिक शिस्तीचा सन्मान झाला आहे, अशी भावना कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी व्यक्त केली.
या पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, उपाध्यक्ष प्रमोद शिंदे व संचालक मंडळ यांनी कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. याबाबत उपाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले की, काही वर्षांपूवी कारखाना आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला होता. ऊस टंचाई, कामगारांचे प्रश्न, वीज दरवाढ आणि कर्जबाजारीपणा, गैरवस्थापनामुळे कारखान्याची गळचेपी झालेली होती. मात्र, कारखान्याने आपल्या युनिटमध्ये तांत्रिक सुधारणा केल्या. कारखान्याचे सर्व प्रकल्प पर्यावरणपूरक वीजनिर्मिती, आसवनी आणि इथेनॉल प्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविले. शेतकऱ्यांशी थेट संवाद ठेवत एफआरपी वेळेवर देऊन कारखान्यावरील विश्वास परत मिळविला. आर्थिक शिस्त पाळली. जीएसटी, आयकर आणि इतर कर नियमित भरण्यावर भर दिला.