सातारा : आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त किसन वीर साखर कारखान्याच्यावतीने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या वापराबाबत कारखाना कार्यस्थळावर शेतकरी मेळावा झाला. यावेळी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री आणि किसन वीर साखर कारखान्याचे चेअरमन मकरंद पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानाच्या वापराची संकल्पना चार ते पाच वर्षांपूर्वी मांडली होती. या संकल्पनेला आता मूर्त स्वरूप आले आहे. ऊस शेतीमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रसानाचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होईल. शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असे प्रतिपादन चेअरमन पाटील यांनी यावेळी केले. शेतकऱ्यांनी पिकवलेला संपूर्ण ऊस किसन वीर व खंडाळा कारखान्याला गाळपासाठी द्यावा. नजीकच्या काळात किसन वीर देखील इतर कारखान्यांप्रमाणे सर्वोत्तम दर देईल, असे आवाहन त्यांनी केले.
मेळाव्यात बारामती येथील एआय विभागाचे प्रमुख तुषार जाधव यांनी कृत्रिम बुद्धिमता तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन क्षमता कशा पद्धतीने वाढवता येते, त्याचे चित्रफितीद्वारे मार्गदर्शन केले. एआय तंत्रज्ञानाचा खर्च आणि त्यामध्ये शेतकरी, कारखाना, व्हीएसआय यांचे किती योगदान राहील, याची माहिती कारखान्याच्या शेती ऑफिसमध्ये देण्यात येणार असल्याचे ए. बी. सुशील यांनी सांगितले. मंत्री मकरंद पाटील व खा. नितीन पाटील यांच्या सूचनेप्रमाणे शेतकरी मेळाव्याचे कमी वेळेत नेटके आयोजन करण्यात आल्याचे प्रमोद शिंदे यांनी सांगितले. यावेळी संचालक शशिकांत पिसाळ, बाबासाहेब कदम, सचिन साळुंखे, रामदास गाढवे, रामदास इथापे, प्रकाश धुरगुडे, संदीप चव्हाण, सचिन जाधव, ललित मुळीक, संजय फाळके, शिवाजीराव जमदाडे, संजय कांबळे, हणमंत चवरे, सुशीला जाधव, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, खंडाळा कारखान्याचे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील आदी उपस्थित होते.