सातारा : पाच तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या किसन वीर कारखान्यास भारतीय शुगरमार्फत देण्यात येणारा ‘बेस्ट रिकन्स्ट्रक्शन ऑफ ‘सिक युनिट फॉर शुगर मिल’ हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. कोल्हापूर येथे शुक्रवारी (ता. १८) होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी ही माहिती दिली. कारखान्याने मदत व पुनर्वसनमंत्री तथा अध्यक्ष मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि खासदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळवले आहे. कारखान्याने शासनाचे अर्थसाहाय्य व त्याचा योग्य पद्धतीने केलेले विनियोग हे कौशल्य पाहून तसेच कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे यांची तत्परता याची दखल घेत कारखान्यास या वर्षीचा ‘बेस्ट रिकन्स्ट्रक्शन ऑफ सिक युनिट फॉर शुगर मिल’ हा पुरस्कार मिळाला आहे.
शिंदे म्हणाले की, “शेतकरी व कामगारांच्या हितासाठी किसन वीर व खंडाळा कारखाना ताब्यात घेऊन मागील तीन हंगाम सुरळीत व कोणत्याही वित्त संस्थेचे साहाय्य न घेता पार पाडले आहेत. इतर कारखान्याच्या बरोबरीने दर देत शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे. तर खासदार पाटील म्हणाले की, भारतीय शुगरने दिलेला पुरस्कारामुळे किसन वीर कारखान्याच्या पंखात बळ आल्याचे समाधान मिळाले आहे. यापुढील काळात नव्या उमेदीने फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आकाशाला गवसणी घालणार असल्याची भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.