सातारा : य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याना पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब करून सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याचा प्रकल्प राबवत आहे. कारखान्याने कार्यान्वित केलेला सल्फर रिमूव्हिंग सिस्टिम (एसआरएस) प्रकल्प कारखान्याच्या प्रगतीशील धोरणाचे द्योतक असून भविष्यातील जलसंकटावर मात करण्यासाठी तो दिशादर्शक ठरणार आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कारखाना कार्यस्थळावर उभारण्यात आलेल्या एसआरएस प्रकल्पाचे उद्घाटन चेअरमन डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
एसआरएस प्रणालीद्वारे सांडपाण्यावर अत्याधुनिक प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे. प्रकल्पाची क्षमता प्रतिदिन १० लाख लिटर इतकी आहे. प्रक्रिया केलेले पाणी प्रामुख्याने स्प्रे पाँडमध्ये वापरण्यात येईल. तसेच शेतीसाठी पाण्याची मागणी वाढल्यास, ईटीपी प्रक्रियेतून निर्धारित मानकांची पूर्तता करून हे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. पर्यावरण संवर्धनासोबतच पाण्याची बचत व शाश्वत वापर साध्य करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा आहे असे सांगण्यात आले. यावेळी संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, शिवाजी पाटील, जे. डी. मोरे, विलास भंडारे, अविनाश खरात, बाजीराव सुतार, वैभव जाखले, जनरल मॅनेजर बालाजी पबसेटवार आदी उपस्थित होते.


















