सातारा : कृष्णा कारखान्याचे कर्मचारी शेताच्या बांधावर जाऊन करणार शेतकऱ्यांना मार्गदर्शन

सातारा : य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्यावतीने ऊस उत्पादनवाढीसाठी ‘फील्ड स्टाफ आपल्या दारी’ हा उपक्रम राबवला जाणार आहे. या उपक्रमासाठी कारखान्याच्या शेती खात्यातील कर्मचाऱ्यांना जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण देण्यात आले. उपक्रमाचा प्रारंभ व्हाइस चेअरमन जगदीश जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडीराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासाहेब शिंदे, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार, मनोज पाटील, कृष्णा कृषी परिषदेचे अध्यक्ष गजेंद्र पाटील, प्राचार्य डॉ. अशोक फरांदे प्रमुख उपस्थित होते.

कृष्णा साखर कारखान्याच्या वतीने चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ शेतकरी सभासदांच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबवत असते. ऊस उत्पादनवाढीसाठी जयवंत आदर्श कृषी योजना, शेतकरी संवाद मेळावे, अल्पदरात द्रवरूप जिवाणू खते, सेंद्रीय खते, माती परीक्षण, घरपोच मोफत साखर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ऊसनोंदी, पारदर्शक तोडणी यंत्रणा असे उपक्रम आहेत. आता ‘फील्ड स्टाफ आपल्या दारी’ हा उपक्रम राबविला जाणार आहे. शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर ऊस लागवडीपासून खोडवा संगोपनापर्यंतचे मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. दर पंधरा दिवसांतून गट ऑफिसला सभासद, अधिकारी व पदाधिकारी यांच्यात चर्चा घडवून आणली जाईल असे बाजीराव सुतार यांनी दिली. यावेळी जनरल मॅनेजर (केन) दादासाहेब शेळके, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here