रेठरे बुद्रुक : राज्यातील साखर कारखान्यांमध्ये प्रथम क्रमांकाचा दर देण्यात कृष्णा सहकारी साखर कारखाना सर्वात पुढे आहे. कारखान्याने पूर्वीच्या संचालक मंडळाची देणी पूर्ण करून सभासदांना २३४ कोटी रुपये आगाऊ रक्कम दिली आहे. १८ कोटी ३० लाख रुपयांचा संचित नफा कारखान्याच्या ताळेबंदामध्ये नमूद आहे. कारखान्याची भक्कम आर्थिक परिस्थितीत आहे. दिवाळीला १११ रुपयाचे ऊस बिल सभासदांना भेट म्हणून दिले आहेत असे प्रतिपादन यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कारखान्याच्या ६९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. अतुल भोसले, उपाध्यक्ष जगदीश जगताप, माजी आमदार भगवानराव साळुंखे, संचालक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
सभेत सर्व ११ विषयांना एकमताने मंजुरी देण्यात आली. अध्यक्ष भोसले यांनी सांगितले की, यापुढील काळात सभासद शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञानाशी जोडणे, तसेच जलसिंचन योजना अडचणीतून बाहेर काढण्याचे उद्दिष्ट आहे. आम्ही सत्ता काळात गाळप क्षमतेत वाढ, तसेच विकासाच्या सर्व बाबी पूर्ण केल्या. ५,५०० मेट्रिक टन गाळप क्षमतेने कारखाना वाढवला. डिस्टिलरी व इथेनॉल निर्मिती वाढवली. उसाचे गळीत, साखर उतारा वाढवला. त्यामुळे अधिकचा दरही देता आला. पुढील टप्प्यात कारखान्याची आणखी प्रगती साधण्याचे ध्येय आहे. गेल्या संचालक मंडळावरील कायदेशीर बाबी न्यायप्रविष्ट आहेत. यात आम्ही कायद्याची जबाबदारी पार पाडू. कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी नोटीस वाचन केले. उपाध्यक्ष जगताप यांनी स्वागत केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.