सातारा : शिरवडे (ता. कराड) येथे ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रेठरे बुद्रुक ता. कराड येथील जयवंतराव भोसले कृष्णा कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर कॉलेजच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी आधुनिक पद्धतीने सुपरकेन ऊस नर्सरीची यशस्वी उभारणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आयोजित करण्यात आलेल्या नर्सरीसाठी विद्यार्थ्यांनी जमीन निवड, सखोल मशागत, बेड निर्मिती, रोगमुक्त बियाकांडाची निवड, जैविक खतांचा वापर, सिंचन व्यवस्था आणि कीड-रोग व्यवस्थापनाच्या आधुनिक तंत्राचा अवलंब केला. ऊस उत्पादनात वाढ करण्यासाठी सुपरकेन नर्सरी महत्त्वाची ठरते, हे लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी तांत्रिक पद्धतींचा वापर केला.
विद्यार्थ्यांनी दिलेल्या मार्गदर्शनाचा फायदा आगामी ऊस लागवडीच्या मोसमात मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे मत व्यक्त केले. लवकरच ही नर्सरी पूर्ण वाढीत येऊन गुणवत्तापूर्ण सुपरकेन रोपे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहेत. ग्रामीण पातळीवरील कृषी शिक्षणाला प्रत्यक्षाशी जोडणारा हा उपक्रम अत्यंत उल्लेखनीय ठरला आहे. कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे, कार्यक्रम समन्वयक प्रा. दीपक भिलवडे, कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण पाटील, प्रा. अमोल आडके, प्रा. प्रशांत भोसले व इतर तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभले आहे. दिग्विजय पाटील, महेश पाटील, श्रीजय शिंगटे, अमेय येनेचवंडी, पृथ्वीराज संकपाल, शिवराज देसाई आणि अनिकेत लोकरे हे कृषिदूत या अभियानात सहभागी झाले आहेत.

















