सातारा : कृष्णा साखर कारखान्याची ऊस बिल वाटपातही आघाडी, शेतकऱ्यांना ७० कोटी रुपये अदा

सातारा : शिवनगर-रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने सातारा जिल्ह्यात सर्वांत प्रथम शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिल जमा करून पुन्हा एकदा आघाडी सिद्ध केली आहे. कारखान्याला पहिल्या पंधरवड्यात पुरवठा झालेल्या ऊसाची प्रतिटन ३ हजार ५०० रुपयांप्रमाणे होणारी बिलाची एकूण रक्कम ७० कोटी ५४ लाख रुपये शेतकरी सभासदांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली आहे. कारखान्याने यंदा गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये जिल्ह्यात सर्वांत पहिल्यांदा ऊसदराची कोंडी फोडली आहे. कारखान्याने प्रतिटन ३,५०० रुपयांचा दर जाहीर केला. या निर्णयाबाबत समाधान व्यक्त होत असताना, कारखान्याने हंगामाच्या सुरुवातीला आवश्यक आधार दिला आहे.

कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी ऊस उत्पादकांना न्याय्य आणि स्पर्धात्मक दर देत, आर्थिक आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. कृष्णा कारखाना केवळ दर देऊनच थांबलेला नाही; तर पहिल्या पंधरवड्यात कारखान्याकडे गळितास आलेल्या ऊसापोटी प्रतिटन ३ हजार ५०० रूपयांप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आल्याने, शेतकरी सभासदांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. कारखान्याने नेहमीच शेतकरी सभासदांचे हित जपत पारदर्शक कारभाराला प्राधान्य दिल्याचे कारखान्याच्या सूत्रांनी सांगितले. पारदर्शी कामकाज, आर्थिक शिस्त आणि शेतकरी केंद्रित निर्णयांमुळे कारखान्याने शेतकऱ्यांमध्ये विश्वासाचे मजबूत नाते निर्माण केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here