सातारा : ऊसतोडणी मजुरांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सामाजिक बांधिलकी जपत यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या वतीने साखर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिसरात चार साखर शाळा सुरू करण्यात आल्या असून, या शाळांमधील २६५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. शालेय साहित्यामध्ये पाटी, पुस्तके, वह्या, पेन, पेन्सिल, चित्रकलेच्या वह्या तसेच गोष्टींची पुस्तके यांचा समावेश होता. साखर शाळांच्या उपक्रमासाठी जनार्थ सेवा संस्था यांचे सहकार्य लाभले आहे.
कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक बाजीराव सुतार यांनी सांगितले की, कृष्णा कारखान्यासाठी ऊसतोडणीसाठी राज्यातील बीड, जालना, धाराशिव, परभणी, सोलापूर आदी जिल्ह्यांतून मजूर कुटुंबे दाखल झाली आहेत. उपजीविकेसाठी शेकडो किलोमीटर प्रवास करून येणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठी कारखान्याने मदतीचा हात पुढे केला आहे. अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली ऊसतोड मजूर व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून, आरोग्य शिबिरांचे आयोजनही करण्यात येते. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आल्याचे सुतार यांनी सांगितले. या कार्यक्रमाला कारखान्याचे व्यवस्थापक दादासाहेब शेळके, शिक्षिका राधिका लोखंडे, स्वाती चोपडे, मानसी चोपडे, मयुरी वडकर, अमृता धर्मे, अश्विनी गायकवाड, दीपाली हुलवान, तसेच शेती व ऊसविकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
















