सातारा : कराड येथील कृष्णा कारखान्याने परिसरातील साखर शाळांतील विद्यार्थ्यांना मायेचा हात दिला. ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याने अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना परिसरात चार साखर शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपत या साखर शाळांतील २६५ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले आहे. शेकडो किलोमीटर लांब येऊन पोटासाठी राबणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणात मदत करण्यासाठी करण्यात आलेली ही मदत मोलाची ठरली आहे.
ऊस तोडणी मजुरांची मुले पालकांसोबत कारखाना परिसरात स्थलांतरीत होतात. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण रखडते. तसे घडू नये यासाठी कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या माध्यमातून ऊसतोड मजूर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसाठी अनेक उपक्रम राबविले जातात असे कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर बाजीराव सुतार यांनी सांगितले. शालेय साहित्य वाटप कार्यक्रमावेळी बोलताना सुतार यांनी कृष्णा कारखान्याकडे ऊसतोड करण्यासाठी राज्यातून बीड, जालना, धाराशिव, परभणी, सोलापूर इत्यादी जिल्ह्यातील ऊसतोड मजूर दाखल झाले आहेत. त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरे आयोजित केली जात आहेत असे सांगितले.
















