सातारा : अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढत आहे. येत्या काळात शेतीमध्ये उत्पादनवाढीसाठी कृष्णा कारखाना ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी पुढाकार घेणार आहे, असे प्रतिपादन य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी केले. कृष्णा कारखान्याच्या ६६ व्या गळीत हंगामाच्या मुहूर्ताप्रसंगी ते बोलत होते. डॉ. सुरेश भोसले व उत्तरा भोसले यांच्या हस्ते आणि आमदार डॉ. अतुल भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत ६६ व्या गळीत हंगामाचा मुहूर्त करण्यात आला.
यावेळी उपाध्यक्ष जगदीश जगताप, संचालक लिंबाजी पाटील, दयानंद पाटील, जितेंद्र पाटील, धोंडिराम जाधव, निवासराव थोरात, संजय पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, जे. डी. मोरे, विलास भंडारे, इंदुमती जाखले, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, श्रीरंग देसाई, दीपक पाटील, सी. एन. देशपांडे, बाजीराव सुतार यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कारखान्याचे आधुनिकीकरण पूर्ण झाले आहे. गाळप क्षमता वाढली असून, यंदा १५ लाख मेट्रीक टन गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना वेळेत ऊसतोड देण्यासंदर्भात, तसेच तोडणीबाबतच्या कोणत्याही तक्रारी उद्भवणार नाहीत, याबाबत कारखाना प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे. येत्या काळात अधिकाधिक क्षेत्रावर ठिबक सिंचन योजना प्रभावीपणे राबविण्यात कृष्णा कारखाना भर देणार आहे.
कर्मचाऱ्यांना बारा टक्के पगारवाढ…
डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने कामगारांना टप्प्याटप्याने पगारवाढ देण्याबरोबरच उत्कृष्ट सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, या कार्यक्रमात अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना या महिन्यापासून १२ टक्के पगारवाढ देणार असल्याची घोषणा करताच, टाळ्यांच्या गजरात सर्व कर्मचाऱ्यांनी या घोषणेचे स्वागत केले.