सातारा : जिल्ह्यात यावर्षीच्या गळीत हंगामासाठी तब्बल एक लाख १४ हजार हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. गेल्या वर्षी तीन महिन्यांतच हंगाम संपला होता. यावेळेस मात्र, परिस्थिती वेगळी आहे. जिल्ह्यात तब्बल एक लाख १४ हजार ०५६ हेक्टर क्षेत्रावर उपलब्ध असलेला ऊस ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून गाळपास येईल. त्याचे व्यवस्थापन करताना सर्वच कारखान्यांची तारांबळ उडणार आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा हंगाम दोन महिने लांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणीवर भर दिला जाईल असे कारखानदारांकडून सांगण्यात येते.
गेल्यावर्षी ९९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते, तरीही एक कोटी क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा कारखान्यांना गाठता आला नाही. यंदा कारखान्यांना ऊस तोडणी, वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेता रस्त्याकडेचा ऊस हार्वेस्टरने तोडण्यावर भर द्यावा लागणार आहे. याबाबत अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते म्हणाले की, यावर्षी सभासदांचा ऊस वेळेत गाळला जावा यासाठी कारखाने प्रयत्न करणार आहेत. ऊस पुरेसा असल्याने गाळप हंगाम चांगला होणार आहे. खासगी कारखान्याकडे ऊस तोडणीचा कोणताही प्रोग्रॅम नसल्याने होणारी पळवापळवी रोखण्याचे आव्हान असेल. तर कारखान्यांनी कार्यक्षेत्राबाहेरील ऊस गाळप करून कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांचे नुकसान करू नये, अन्थया न्यायालयात जाऊ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला.