सातारा : जिल्ह्यातील गाळप हंगाम नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस सुरू झाला होता. यंदा दुष्काळी तालुक्यांसह सर्वत्र ऊस लागवड झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध झाला. मात्र साखर कारखान्यांची वाढलेली संख्या व वाढलेली जिल्ह्यात साखर निर्मितीचा कोटीचा टप्पा क्षमता यामुळे गळीत हंगाम अवघ्या चार महिन्यांतच संपला. तरीही या कालावधीत साखर निर्मितीने एक कोटीचा टप्पा गाठला. जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी मिळून या हंगामात एक कोटी आठ लाख ४९ हजार ९९१ टन उसाचे गाळप झाले आहे. त्यापासून एक कोटी सात हजार ५७ हजार ३० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. या हंगामात सरासरी ९.३१ टक्के साखर उतारा मिळाला. गाळप व साखर निर्मितीत जरंडेश्वर साखर कारखान्याने तर साखर उताऱ्यात अजिंक्यतारा साखर कारखान्याने आघाडी घेतली.
यंदाच्या हंगामात खासगी साखर कारखान्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस गाळप करत आघाडी घेतली. नऊ सहकारी व आठ खासगी कारखान्यांनी गाळप केले. ऊस गाळप व साखरनिर्मितीत जरंडेश्वर साखर कारखान्याने आघाडी घेतली आहे. कारखान्याने १९,१५,१६६ मेट्रिक टन उसाचे गाळप करत १६,३५,१०० क्विंटल साखरनिर्मिती केली आहे. साखर उताऱ्यात अजिंक्यतारा साखर कारखाना अव्वल ठरला असून या कारखान्याला सरासरी १२.६६ टक्के उतारा मिळाला आहे. सहकारी साखर कारखान्यांनी कमी गाळप करूनही अधिक साखरनिर्मिती केली आहे. बहुतांश साखर कारखान्यांनी प्रतिटन ३३०० ते ३५०० रुपये दर दिला. हंगामाचे दर लवकर निश्चित झाल्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली नाहीत. तरीही उसाचे बिल १४ दिवसांत देण्याची कायदेशीर अट असतानाही अनेक कारखान्यांकडून शेतकऱ्यांना एक ते दीड महिना उशिराने पैसे देण्यात आले.


















