सातारा : यंदा जिल्ह्यात तब्बल एक लाख १४ हजार ०५६ हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. हा ऊस ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये गाळपास येणार आहे. जिल्ह्याचे सरासरी उसाचे लागवड क्षेत्र ९८ हजार ४७९ हेक्टर आहे. त्या तुलनेत यंदा जादा ऊस उपलब्ध आहे. सातारा, कऱ्हाड आणि कोरेगाव या तालुक्यात सर्वाधिक ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे कारखान्यांना यावेळेस गाळपाचे नियोजन करावे लागणार आहे. या हंगामात १६ ते १७ कारखान्यांनी गाळपाची तयारी केली आहे. सध्या ऊस तोडणी यंत्रणेसाठी करार करण्याचे काम सुरू आहे. जादा ऊस असल्याने वेळेत गाळपासाठी सर्व कारखान्यांची तारांबळ उडणार आहे. त्यामुळे तोडणी, वाहतुकीचे नियोजन करावे लागणार आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी उपलब्ध असूनही अनेक कारखान्यांनी आपली गाळप क्षमता वाढविल्याने तीन महिन्यांतच हंगाम संपला होता. साधारण ९९ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप झाले होते. साखर उत्पादन मात्र एक कोटी क्विंटलपेक्षा कमी झाल होते. गेल्या वर्षी ऊस तोडणी, वाहतूक व्यवस्था विस्कळित होती, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे ऊस उशिरा तोडला गेला. यावर्षी कार्यक्षेत्रातील मोठ्या प्रमाणात असलेला ऊस वेळेत जाण्यासाठी कारखान्यांना तोडणी वाहतूक व्यवस्थेचे नियोजन करावे लागेल. पावसाचे प्रमाण लक्षात घेता रस्त्याकडेचा ऊस हार्वेस्टरने तोडण्यावर भर द्यावा लागणार आहे. दरम्यान, आपला ऊस वेळेत जावा, यासाठी शेतकऱ्यांनी एकापेक्षा जास्त कारखान्यांकडे उसाची नोंदणी केली आहे.