सातारा : अजिंक्यतारा प्रतापगड साखर उद्योग समूहाने नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या यंदाच्या गळीत हंगामात तब्बल एक लाख नऊ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. या काळात १०.१० टक्के साखर उतारा मिळाला आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील उसाची तोड पूर्ण क्षमतेने केली जाईल, शेतकऱ्यांनी निश्चित राहावे, कोणतेही नुकसान होणार नाही. यंदाच्या हंगामात कारखान्याकडून शेतकऱ्यांना एकरकमी प्रतिटन ३३५० रुपये दर जाहीर करण्यात आला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष सौरभ शिंदे यांनी दिली. या वेळी कारखान्याचे संचालक, कार्यकारी संचालक व सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
अध्यक्ष सौरभ शिंदे म्हणाले की, या गाळप हंगामात चार लाख गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या ५० दिवसांत एक लाख १० हजारहून अधिक टन उसाचे गाळप केले आहे. कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता २५०० मे. टन इतकी आहे. मार्चअखेर सर्व ऊसतोड पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. प्रतापगड कारखाना अचूक वजनकाटे व शेतकऱ्यांना दराचा दिलेला शब्द पाळणारा कारखाना म्हणून ओळखला जातो. सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने हंगामाचे योग्य नियोजन केले आहे. आगामी काळात कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून यंदाचे गाळप उद्दिष्ट पूर्ण केले जाणार आहे.

















