सातारा : सहकारी कारखाने माणुसकी, सामाजिक बांधिलकी जपतात. सहकारी साखर कारखान्याकडे सर्व सभासद उत्पादकांचा ऊस स्वीकारण्याची जबाबदारी असते. मात्र, खासगी कारखान्यांचे सहकार क्षेत्रासाठी मोठे आव्हान आहे, असे मत सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची ५५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात झाली. यावेळी ते बोलत होते. इथेनॉल निर्मितीतून कारखान्याला चांगले उत्पन्न मिळत असून, नवीन विस्तारीकरण योजनांचा निश्चितच फायदा होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांनी क्षणिक मोहाला बळी न पडता सहकारी कारखान्याला सहकार्य करावे. सहकारी कारखान्यांनी रस्ते करायचे आणि शेतकऱ्यांनी ऊस खासगीकडे घालायचा, हे गंभीर आहे. सहकारी कारखान्याकडे ऊस येण्याची काळजी सर्वांनी घ्यावी असे ते म्हणाले.
वार्षिक सभेत विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन आणि मागील सभेचे प्रोसिडिंग भास्कर कुंभार यांनी वाचून कायम केले. नोटीस वाचन कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे यांनी केले. सभेत शेतकऱ्यांच्या ऊस तोडणीसाठी टोळीधारक व वाहनधारकांकडून पैसे मागितले जातात, अशी तक्रार काही सभासदांनी केली. यावेळी पाटील म्हणाले, “अशा लोकांना पैसे न देण्याचा ठराव प्रथम संपूर्ण गावाने करून घ्यावा, पैसे न देण्याची खबरदारी घ्यावी. अशी परिस्थिती महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे; परंतु आपल्या कार्यक्षेत्रात असे घडत असेल तर संपूर्ण गावाने निर्णय घ्यावा. आपण सभासद शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहोत. उपाध्यक्ष कांतिलाल पाटील यांनी आभार मानले. कारखान्याचे संचालक जसराज पाटील, कऱ्हाड तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष देवराज पाटील, माजी शिक्षण व अर्थ सभापती मानसिंगराव जगदाळे, तानाजीराव साळुंखे, उपाध्यक्ष कांतिलाल पाटील, राजेंद्र चव्हाण, माणिकराव पाटील, सर्व संचालक, ऊस उत्पादक सभासद उपस्थित होते.