सातारा : यंदा ऊस दराची काळजी करू नका. स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुक्याला उच्चांकी ऊस दर मिळवून देईल, असा विश्वास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. गोपूज येथे रविवारी ऊस दर निर्णायक बैठकीत ते बोलत होते. राज्यभर अतीवृष्टी, महापुरामुळे यंदा उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. कारखाने ऊस मिळविण्यासाठी स्पर्धा करतील. तरीही शेतकऱ्यांनी ऊस तोडीची गडबड करू नये असे आवाहन त्यांनी केले. कारखानदार समाजसुधारक नसून लुटारूंची टोळी आहे. वेळप्रसंगी ते भंगाराच्या दरात तुमचा ऊस न्यायला मागे-पुढे बघणार नाहीत अशी टीकाही शेट्टी यांनी केली.
माजी खासदार शेट्टी म्हणाले की, साकर कारखानदार रिकव्हरी व काटा चोरी करून काळा पैसा कमावत आहेत. साखर कारखानदारांची पाचही बोटे तुपात आहेत. सध्या कारखानदार नफ्यात आणि शेतकरी तोट्यात अशी स्थिती आहे. मात्र, शेतकऱ्यांनी गडबड न करता आपल्या कष्टाने पिकवलेल्या ऊस पिकाचे योग्य दाम घेतल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. यंदा ऊस मिळवण्यासाठी कारखान्यांमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण होईल. त्यामुळे गडबड करू नका. राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊस बिलांमधून प्रतिटन १५ रुपये कपात करण्याचा निर्णय मंजूर केला आहे. आम्ही ती कपात करून देणार नाही. शेतकरी टनाला १५ रुपये देणार नाहीत.