सातारा : योग्य दर मिळाल्याशिवाय कारखान्यांना ऊस न देण्याचे राजू शेट्टी यांचे आवाहन

सातारा : यंदा ऊस मिळवण्यासाठी कारखान्यांच्या प्रचंड स्पर्धा निर्माण होणार आहे. निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे यंदा उसाच्या उत्पादनात घट होणार आहे ऊस आम्हाला द्या म्हणून कारखाने मागे लागतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड करू नये. आपल्या कष्टाने पिकवलेल्या ऊस पिकाचे योग्य दाम घेतल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले. गोपूज येथे रविवारी ऊस दर निर्णायक बैठकीत ते बोलत होते. यावेळी शेट्टी यांनी साखर कारखानदारांवर जोरदार टीका केली. जर शेतकऱ्यांनी ऊस तोडीची गडबड केली, तर कारखाने भंगाराच्या दरात तुमचा ऊस न्यायला मागे-पुढे बघणार नाहीत असा इशाराही त्यांनी दिला.

राजू शेट्टी म्हणाले की, साखर कारखानदार रिकव्हरी व काटा चोरी करून काळा पैसा कमावण्याचा त्यांचा धंदा आहे. कारखानदार समाजसुधारक नसून लुटारूंची टोळी आहे. यंदा दराची काळजी करू नका. स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुक्याला उच्चांकी दर मिळवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलांतून १५ रुपये प्रतीटन कपात करून ते पूरग्रस्त, अतिवृष्टीग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आम्ही ती कपात करून देणार नाही. कर्जबुडव्या उद्योगपतींकडून व मोठ्या उद्योजकांकडून पैसे कपात करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here