सातारा : साखर कारखान्यांच्या वजन काट्यांची तपासणी करण्याची रयत क्रांती शेतकरी संघटनेची मागणी

सातारा : जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाला सुरुवात होऊन धुराडी पेटली आहेत. मात्र, या कारखान्यांच्या वजन काट्यांची निःपक्षपातीपणे तपासणी झालेली नाही. कारखान्याच्या वजन काट्यात दाखवले जाणारे वजन आणि प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणाऱ्या वजनात मोठी तफावत असल्याची तक्रार वाढू लागली आहे. या तफावतीची नोंद केवळ शेतकरीच नव्हे, तर वाहतूकदार आणि अनुभवी तोडकरी मजूरही घेत असल्याचा दावा रयत क्रांती संघटनेने केला आहे. वजन काट्यांची तपासणी व्हावी, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा रयत क्रांती संघटनेकडून देण्यात आला आहे.

याबाबत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे कराड तालुका अध्यक्ष विशाल पुस्तके म्हणाले की, प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे. वर्षानुवर्षे उसतोडणी करणाऱ्या मजुरांना वजनातील फसवणूक लगेच लक्षात येते. प्रशासनाने ऊस वजन काट्यांची तात्काळ तपासणी करून वस्तुस्थिती बाहेर आणावी, अन्यथा तीव्र आंदोलन केले जाणार आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा योग्य दाम मिळालाच पाहिजे. सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने त्वरित हस्तक्षेप करून काट्यांची तपासणी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here