सातारा : यंदाच्या हंगामासाठी सह्याद्री साखर कारखान्याकडे २०,२०३ हेक्टर क्षेत्रावरील ऊसाची नोंद

सातारा : सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ हंगामासाठी मिल रोलर पूजन समारंभ माजी सहकार पणन मंत्री, सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील, व्हाईस चेअरमन कांतीलाल भोसले-पाटील आणि नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नुकताच झाला. यावेळी संचालक संतोष घार्गे, संजय गोरे व संजय कुंभार यांच्या हस्ते श्री गणेश पूजन करण्यात आले. येत्या सन २०२५-२६ गळीत हंगामासाठी मशिनरी ओव्हरहॉलिंगची कामे गतीने सुरू आहेत. यंदाच्या हंगामासाठी कारखान्याकडे २०,२०३ हेक्टर क्षेत्रावरील ऊसाची नोंद गळीतासाठी झालेली आहे. ऊस तोडणी व वाहतूक उभारणीसाठी करार करण्याचे काम सुरू आहे. कारखान्याचे सर्व सभासद व बिगर सभासद यांनी त्यांनी पिकविलेला व कारखान्याकडे नोंदविलेला सर्व ऊस कारखान्याकडे गळीतासाठी द्यावा, असे आवाहन चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी केले.

यावेळी कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील यांनी माहिती दिली की, कारखान्याच्या सभासदांना, त्यांनी धारण केलेल्या प्रति शेअरला वार्षिक ६० किलो साखर मोफत देण्याच्या घोषणेनुसार १ एप्रिल २०२५ पासून, सभासदांना त्यांचे मागणी व गरजेनुसार कारखाना कार्यस्थळावरील सभासद साखर दुकानात मोफत साखर देण्यात येत आहे. सभासद साखर कार्डवर शिल्लक असणारी संपूर्ण साखर दीपावली सणापूर्वी सभासदांना गांव पोहोच देण्यात येणार आहे, असे सांगून नोंदविलेला संपूर्ण ऊस सह्याद्रि कारखान्याकडे गळीतास पाठवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी कारखान्याचे संचालक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here