सातारा : छत्रपती शिवाजी कॉलेजच्या भूगोल विभागाने सामाजिक बांधिलकी जपत ऊसतोड कामगारांसाठी जीवनावश्यक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविला. वेचले येथील पालावर राहणाऱ्या चाळीसगाव व बीड जिल्ह्यातील कामगार कुटुंबांना साड्या, किराणा माल व उपवासाच्या पदार्थांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमांतर्गत साखर, तेल, तांदूळ यांसह शेंगदाणे, साबुदाणा, केळी, राजगिऱ्याचे लाडू, खजूर आदी साहित्य देण्यात आले.
व्हॅलेंटाईन डेनिमित्त कष्टकरी वर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव जागृत करण्याचा प्रयत्न असल्याचे महाविद्यालयाच्यावतीने सांगण्यात आले. भूगोल विभागप्रमुख डॉ. साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. प्राध्यापकांनी कामगारांच्या वस्तीत जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी ऊसतोड कामगार व ग्रामस्थांशी संवाद साधला. डॉ. अभिमान निमसे यांनी सूत्रसंचालन केले. भूगोल विभागातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या विधायक उपक्रमाचे वेचले ग्रामस्थ व ऊसतोड कामगारांकडून कौतुक होत आहे.
















