सातारा : जिल्ह्यात यंदाचा ऊस गळीत हंगाम गतीने सुरू आहे. मात्र अद्यापही सहा साखर कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही. लवकरात लवकर दर जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. प्रतापगड, किसनवीर, खंडाळा, स्वराज, शरयू श्रीराम या सहा कारखान्यांनी अजूनही दर जाहीर केलेले नाहीत. उसाचे बिल १५ दिवसांत न दिल्यास वार्षिक १५ टक्के व्याजासह रक्कम देणे बंधनकारक आहे. पण, त्याकडेच दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यात १७ कारखान्यांचे गाळप सुरू झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३६.४९ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले आहे. जिल्ह्यात कृष्णा, जयवंत शुगर्स, रयत अथणी, सह्याद्री, जरंडेश्वर, शिवनेरी, अजिंक्यतारा यांनी ३५०० . माण-खटाव, ग्रीन गोपूज, वर्धन ॲग्रो ३३०० रुपये, दत्त इंडिया (साखरवाडी) ३४०० तर पाटणच्या देसाई कारखान्याने ३००० दर जाहीर केला आहे. मात्र, उर्वरीत कारखानदारांनी दर जाहीर केलेला नाही. दराबाबत या मनमानीसह साखर उताऱ्याबाबतही शेतकऱ्यांकडून तक्रारी आहेत. साखर उताऱ्याबाबत थर्ड पार्टी ऑडिटची मागणी होत आहे. मागील साखर उताऱ्यावर यावर्षीचा एफआरपी ठरत असल्याने इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी दर मिळत आहे. यंदा १०.२५ बेस रिकव्हरी गृहित धरून ३५५० एफआरपी निश्चित केली आहे. परंतु, हा दर कधी जाहीर होणार याची प्रतिक्षा आहे. याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी अशा कारखान्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


















