सातारा : जिल्ह्यात आतापर्यंत ६७ हजार हेक्टर ऊस लागवड पूर्ण, आडसाली ऊस तोडणी ठरतेय डोकेदुखी

सातारा : जिल्ह्यातील अनेक शेतकरी उत्पादन जास्त मिळावे यादृष्टीने आडसाली ऊस लागवड करतात. त्यामुळे प्रत्येक वर्षी आडसाली क्षेत्रात वाढ होत गेली आहे. आता आडसाली ऊस तोडणी नियोजन करताना कारखान्यांची डोकेदुखी ठरू लागली आहे. बहुतांश शेतकरी जूनपासून लागवड करत असल्याने एकाच तारखेची नोंदणी जास्त होते. हा एकाच तारखेचा ऊस वेळेवर तोडला जात नसल्याने वादावादी होत असते. अशाचतच क्षेत्रात वाढ झाल्याने आडसाली १८ महिनेहून अधिक काळ ऊस तोडला जात नसल्याने उत्पादन घट होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात आडसाली, पूर्वहंगामी हंगामातील ऊस लागवड पूर्ण झाली असून सुरू हंगामातील ऊस लागवड सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६७ हजार ८२२ हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. एकूण क्षेत्राचा अंदाज बघता पुढील वर्षी एक लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस गाळपास उपलब्ध होण्याचा अंदाज आहे.

जिल्‍ह्यात एकूण ३४,६१४ हेक्टर क्षेत्रावर आडसाली ऊस लागवड झाली आहे. कऱ्हाड, सातारा, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत उसाची सर्वाधिक लागवड केली जाते. या तालुक्यात आडसाली हंगामातील ऊस लागवड होते. या लागवडी पूर्ण झाल्या आहेत. आता शेतकऱ्यांनी सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत पूर्वहंगामी उसाची लागवड करण्यासाठी नियोजन केले. पूर्वहंगामात २९८६४ हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. सध्या सुरू हंगामात आतापर्यंत ४०२४ हेक्टर लागवड सुरू आहे. फेब्रुवारीअखेर या क्षेत्रात वाढ होणार आहे. सध्या सुरू असलेला गाळप हंगाम मार्चअखेर सुरू राहणार आहे. हंगाम संपल्यावर खोडवा उसाचे क्षेत्र निश्चित होईल. जिल्ह्यात चांगला पाऊस झाला असल्यामुळे पाण्याची कमतरता भासलेली नाही. त्यामुळे ऊस लागवडीच्या क्षेत्रात वाढ होईल, असा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here