सातारा- ऊस मुकादमांकडून लाखोंची फसवणूक : शेख यांच्या आरोपाला वाहतूकदारांचे उत्तर

सातारा : गेल्या तीन-चार वर्षांत फलटण तालुक्यातील ऊस वाहतूकदार मालकांची ऊस टोळी मुकादमांकडून लाखो रुपयांची फसवणूक झाली आहे. अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी मुकादमांना पाठीशी घालू नये. ऊस वाहतूकदार मालकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी ऊस वाहतूकदार मालकांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे. राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ऊस वाहतूकदार मालकांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी तालुक्यातील अशोक केंगार (काशीदवाडी), अर्जुन गावडे (गुणवरे), अनिल ढमाळ (पिंप्रद), अच्युत माने (आसू) यांच्यासह अनेक ऊस वाहतूकदार मालक उपस्थित होते.

ऊस वाहतूकदार मालक म्हणाले, “गेल्या तीन-चार वर्षांत सोने गहाण ठेवून बीड, धुळे जिल्ह्यांतील प्रत्येक मुकादमांना दहा कोयत्यामागे कोणी चार लाख, कोणी पाच लाख रुपये अॅडव्हान्स दिलेला आहे. हंगाम सुरू होण्यापूर्वी टोळी आणायला गेलो, तर मुकादम गायब होतात. कधी भेटले तर या सिझनला येतो, तर कधी पुढच्या सिझनला टोळी देतो, अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन वेळ मारून नेतात. वर्षानुवर्षे हेलपाटे मारून टोळी तर नाहीच; परंतु दिलेला अॅडव्हान्सही आजपर्यंत परत मिळालेला नाही, असे अनेक मालकांनी सांगितले. मुकादमांच्या फसवणुकीच्या प्रकारांमुळे मालकांना आपले अनेकांना ट्रॅक्टर विकावे लागले आहेत. त्यांची कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे मेहबूब शेख यांनी मुकादमांना पाठीशी घालू नये.” ऊस वाहतूकदार मालकांना न्याय मिळवून द्यावा. सोबतच शासनानेही यात लक्ष घालावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here