सातारा : ऊस वाहतुकदाराची दहा लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अशोक सुदाम ढगे (रा. आंबड रोड, शंकर नगर, जालना) या मुकादमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी कोर्टी येथील संदीप सूर्यकांत थोरात यांनी फिर्याद दिली. एकूण १० लाख रुपयांची फसवणूक संशयिताने केली आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच थोरात यांनी कराड शहर पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी अशोक ढगे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप थोरात हे काही सहकारी साखर कारखान्यांसाठी ऊस वाहतुकीचे काम करतात. तीन वर्षांपूर्वी, २०२२-२३ च्या हंगामात मुकादम अशोक ढगेने त्यांचा विश्वास संपादन करत १८ मजूर पुरविण्याचे आश्वासन दिले. त्याबदल्यात त्याने थोरात यांच्याकडून दीड लाख रुपये आगाऊ घेतले. त्यानंतर ३ जून २०२३ रोजी कराड येथे नोटरी करार करून आणखी २ लाख रुपये घेतले. थोरात यांनी ५ जून ते २०२० ऑक्टोबर २०२३ या काळात आणखी ७ लाख रुपये अशोक ढगेला दिले. एकूण १० लाख रुपये देऊनही करारानुसार अशोक ढगेने मजूर पुरवले नाहीत. त्यानंतर तो गायब झाला. त्यानंतर थोरात यांनी फिर्याद दिली आहे.