सातारा ‘स्वाभिमानी’चा जरंडेश्वर शुगर मिलला दोन दिवसांचा अल्टिमेटम !

सातारा : चिमणगाव (ता. कोरेगाव) येथील जरंडेश्वर शुगर मिलने सोमवारी (ता. १७) जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेल्या साखर कारखानदारांच्या बैठकीत समाधानकारक ऊसदर जाहीर करावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आज दुपारी देण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जरंडेश्वर शुगर मिलने उसाचा दर प्रतिटन तीन हजार ७५१ रुपये त्वरित जाहीर करावा, या मागणीसाठी आज सकाळी ११ वाजता सातारा- लातूर राष्ट्रीय महामार्गावर चिमणगाव येथे जरंडेश्वरसह अन्य साखर कारखान्यांची ‘ऊस वाहतूक रोको’ आंदोलन जाहीर केले होते.

दुपारी साडेबारा वाजता संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार, प्रदेश सरचिटणीस सूर्यभान जाधव, जिल्हाध्यक्ष राजू शेळके, तालुकाध्यक्ष जीवन शिर्के आदी पदाधिकारी व शेतकरी जमा झाले. त्या वेळी जरंडेश्वर कारखान्याचे कार्यालयीन अधीक्षक संदीप सावंत, शेती अधिकारी सुजय पवार, श्री. थोपटे यांच्यासह इतर अधिकारी हजर झाले. दोन्ही बाजूने चर्चा सुरू झाली. संघटनेने ऊसदर जाहीर करा, अन्यथा वाहने अडवून धरू, अशी भूमिका मांडली. त्यावर सावंत यांनी येत्या सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी कारखानदारांची बैठक बोलावली आहे. तोपर्यंत थांबा, असे सांगितले. भर रस्त्यावर चर्चा नको आपण कारखान्यात जाऊन या विषयावर चर्चा करून योग्य निर्णय घेऊ, अशी भूमिका संघटनेने घेतली आणि सर्वांनी घोषणा देत मोर्चा कारखान्याकडे वळविला, कारखान्याच्या प्रवेशद्वारावर संघटनेचे नेते, कार्यकर्ते व ऊस उत्पादकांनी ठिय्या मांडला. यावेळी गव्हाणीत उड्या घेण्याचा इशाराही दिला.

पोलिस निरीक्षक बल्लाळ यांनी आंदोलकांची समजूत काढली. यावेळी दराबाबत लेखी देण्याची मागणीही कार्यकर्त्यांनी केली. मात्र, लेखी देण्यास सावंत यांनी नकार दिल्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले. पोलिस निरीक्षक बल्लाळ यांनी प्रांताधिकारी प्रमोद कुदळे बांना मोबाईलवरून आंदोलनाची माहिती दिली. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधून तेथून जिल्हाध्यक्ष श्री. शेळके यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून सोमवारच्या बैठकीचे निमंत्रण पाठवले. पत्र मिळाल्यानंतर संघटनेच्या अनिल पवार यांनी राजू शेट्टी यांच्याशी मोबाईलवरून संवाद साधून बैठकीपर्यंत आंदोलन स्थगित करतो, समाधानकारक ऊसदर जाहीर केला नाही, तर आंदोलन उभे केले जाईल, असे सांगितले. त्या आंदोलनाचे नेतृत्व करण्याचे शेट्टी यांनी मान्य केले. या वेळी सहायक पोलिस निरीक्षक संध्या खटावकर उपस्थित होत्या.

यावेळी ‘स्वाभिमानी’चे राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, तानाजी देशमुख, खटाव तालुकाध्यक्ष दत्तू घार्गे, कन्हाड उत्तरचे अध्यक्ष प्रमोद जगदाळे, विश्वासराव चव्हाण, सूर्यकांत भुजबळ, सुभाष जाधव, विजय झांजुर्णे, सागर गोडसे, दत्तात्रय साळुंखे, पंडित झांजुणें, संकेत साळुंखे, उत्तम शिर्के, राजेंद्र निकम, अशोक झांजुणें, श्रीकांत गोरे, प्रवीण शिर्के, मनोज झांजुणें, राकेश झांजुणें, विलास मोरे, शरद खाडे, राजू घाडगे, सुनील पाटील, प्रशांत जाधव, विजय जगदाळे, जोतिराम झांजुर्णे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here