सातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वर्धनगड घाटाच्या पायथ्याशी चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिलला जाणारी उसाची वाहने अडवून ऊस दराबाबत जाब विचारला. जोपर्यंत ऊसदर घोषित केला जात नाही, तोपर्यंत उसाचे एक कांडेही गाळपासाठी जाऊ देणार नसल्याचा इशारा संघटनेचे राज्य प्रवक्ते अनिल पवार यांनी दिला. संघटनेचे खटाव तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे यांच्यासह कार्यकर्त्यांनी कारखान्याचे शेती अधिकारी श्री. थोपटे, ऊस पुरवठा अधिकारी संतोष कणसे, हणमंत क्षीरसागर आदींना जाब विचारला. राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत ऊस गाळप परवाना मिळालेला नसतानाही जरंडेश्वर शुगर मिलने गळीत हंगामाला कशी सुरुवात केली असा सवाल करण्यात आला.
यावेळी साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी आमची हंगामाची पूर्व तयारी सुरू आहे. एक ते दोन दिवसांत याबाबत वरिष्ठांशी बोलण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. तर ऊसदर घोषित न करता कारखाना सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही तो पूर्ण ताकदीने हाणून पाडू, असा इशारा पवार यांनी दिला. दरम्यान, यावेळी कोरेगाव पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर पवार यांनी प्रश्न उपस्थित केले. जेव्हा आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी महामार्गावर आंदोलन करतो, तेव्हा कोरेगाव पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी कारखान्याच्या दबावाखाली येऊन जागे होतात, असा आरोप त्यांनी केला.












