सातारा : सातारा जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांचे गाळप सुरू असून, ऊसतोड जोमात सुरू आहे. मात्र, ऊस तोडणीदरम्यान बिबट्या आणि मानव संघर्षात वाढ होऊ लागली आहे. उसाच्या शेतात सातत्याने बिबट्या आणि बछडे दिसण्याचे प्रमाण या घटना वाढू लागल्या असल्याने ही बाब गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे. तज्ज्ञांच्या मते बिबट्याच्या तीन ते चार पिढ्या उसाच्या फडातच वाढल्या आहेत. ऊस तोडीनंतरच्या काळात अनेकदा पाळीव जनावरांवर हल्ल्याचे प्रकारही वाढले असून, माजगावात एका ग्रामस्थावरही हल्ला झाला आहे. त्यामुळे वनविभाग, साखर कारखाना यांच्यात समन्वय वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे. शिवाय शेतकरी, ऊसतोडणी मजुरांनी सतर्क राहण्याची गरज आहे.
उसाच्या फडात येणाऱ्या मजुरांच्या सुरक्षेचाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. या मजुरांची लहान मुलेही त्यांच्यासोबत असतात. बिबट्या मोठ्या माणसांऐवजी लहान मुलांना लक्ष्य करू शकतो. संबंधित कारखाने आणि वन विभाग यांच्यातही समन्वय होण्याची गरज निर्माण झाली आहे. शेतकरी तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऊस तोडीनंतर मादी बिबट्या सहसा दुसऱ्या उसाच्या फडात किंवा लगतच्या जंगल पट्टचात स्थलांतर करतात. नवीन क्षेत्रात सुरक्षित ठिकाण शोधत असताना त्यांची मानवी वस्तीजवळ हालचाल वाढते. उसाच्या फडात बिबट्याचा वावर आहे, तेथे ऊसतोड आली की अन्यत्र आश्रय घ्यावा लागत आहे. या धांदलीत अनेकदा बछडे आईपासून दुरावले जात आहेत. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बछड्यांची आईशी भेट घडवण्यासाठी रात्रभर ठाण मांडावे लागत आहे.


















