सातारा : राज्यातील ऊसतोड मजुरांचा परतीचा प्रवास सुरू

सातारा : सध्या ऊसतोड हंगाम संपत आल्याने साखर कारखान्यांची धुराडी शांत होत आहेत. त्यामुळे मजुरांचे तांडे परतीच्या वाटेवर निघाले आहेत. ट्रॅक्टर-ट्रॉली, ट्रक, टेम्पोमध्ये संसाराचा गाडा घेऊन गावाकडे परतू लागले आहेत. परप्रांतातून मायदेशी आपल्या कुटुंबांचे तांडे परत घेऊन येताना महिलांसह सर्वांनीच नाचून आनंद व्यक्त केला. दरम्यान, माण तालुक्याची ओळख केवळ ऊसतोड मजुरांचा तालुका अशीच राहू नये, यासाठी ठोस उपाययोजना आवश्यक आहेत. स्थानिक पातळीवर उद्योगनिर्मिती, शेतीपूरक व्यवसाय, महिलांसाठी स्वयंसहाय्यता गट, तसेच मुलांच्या शिक्षणासाठी स्थलांतरित कामगारांसाठी विशेष शैक्षणिक योजना राबवणे गरजेचे आहे.

माण तालुका दुष्काळी प्रदेश म्हणून ओळखला जातो. कामाच्या शोधात परप्रांतात मजूर आणि कुटुंबासह निघणारे तांडे येथे दिसतात. दरवर्षी ऊसतोड हंगाम सुरू होताच माण तालुक्यातील हजारो कुटुंबे घरदार मागे ठेवून परमुलखात जातात. स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी अपुऱ्या आहेत. शेतीपूरक उद्योगांचा अभाव, हमीभावातील अनिश्चितता आणि उत्पन्नाची कमतरता यामुळे पुढील हंगामात स्थलांतर अपरिहार्य ठरते. ऊसतोडीमुळे अनेक मुलांचे शिक्षण खंडित होते. शिक्षणाची दोरी तुटते आणि मजुरीचा वारसा पिढ्यानपिढ्या पुढे चालू राहतो, हे वास्तव माण तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांत पाहायला मिळते. त्यामुळे स्थलांतरित कामगारांच्या मुलांसाठी विशेष शैक्षणिक योजना राबवणे गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here