सातारा : सह्याद्री कारखान्याची क्षमता वाढणार, दररोज करणार ११ हजार मे. टन ऊस गाळप

सातारा : यशवंतराव चव्हाण यांच्या प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या आणि ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी दूरदृष्टीतून सह्याद्री साखर कारखान्याने पाहिलेले १०,००० मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्टाचे स्वप्न आता साकार झाले आहे. नवीन प्रकल्पामुळे प्रतिदिन ११,००० मेट्रिक टनापेक्षा अधिक गाळप क्षमतेचे उद्दिष्ट आता साध्य होईल. संपूर्ण ऊस गाळपाबरोबरच तोडणीच्या तथाकथित तक्रारींना पायबंद बसेल, असा विश्वास सह्याद्री कारखान्याचे अध्यक्ष, माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. अनेक अडचणींवर मात करत आता पूर्ण क्षमतेने गाळपास यश आले असून, १६ जानेवारीला त्याची यशस्वी चाचणी घेतली. टप्प्याटप्प्याने क्षमता वाढवून हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल, असे त्यांनी सांगितले.

याबाबत माहिती देताना अध्यक्ष बाळासाहेब पाटील म्हणाले की, कारखान्याची स्थापना १९७० मध्ये झाली. संस्थापक (कै.) पी. डी. पाटील यांनी दहा हजार मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले होते. आम्ही कार्यक्षेत्रातील वाढत्या ऊस उत्पादनामुळे विस्तारवाढ प्रकल्पाची गरज ओळखून वाटचाल सुरू केली. मात्र, अनेक अडचणी आल्या. सहकारमंत्री असताना सर्व कागदपत्रांची रीतसर पूर्तता करून मंत्रिमंडळासमोर मंजुरी घेतली. दरम्यान युक्रेन युद्धामुळे स्टीलमध्ये दरवाढीने प्रकल्प लांबला. प्रकल्प सुरू असताना चक्रीवादळाचा तडाखा बसला. विस्तारवाढ शेडबरोबरच कारखान्याचे प्रचंड नुकसान झाले. पुन्हा काही तांत्रिक बाबीमुळे विस्तार वाढीतील दीडशे मेट्रिक टनाचा बॉयलरच्या टेक्निकल बाबी पूर्ण करण्यासाठी काही अवधी गेला. आता या सर्व अडचणी सोडवून कारखाना विस्तारीत प्रकल्पासह सज्ज आहे. यावेळी उपाध्यक्ष कांतिलाल पाटील, संचालक जशराज पाटील, संचालक, कार्यकारी संचालक विश्वजित शिंदे, प्रकाश सोनवणे, आर. जी. तांबे, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here