सातारा : जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपुष्टात आला आहे. आता दहा कारखाने गाळप करत असून शिल्लक उसाचे क्षेत्र बघता पुढील आठ दिवसांत सर्व कारखान्यांच्या हंगामाची सांगता होण्याची शक्यता आहे. सर्व १७ कारखान्यांनी रविवारअखेर एक कोटी २८ लाख पाच हजार ५६४ टन ऊस गाळप केले आहे. तर एक कोटी चार लाख नऊ हजार ३७० क्विंटल साखर निर्मिती केली आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ९.९३ टक्के आहे. हंगाम संपत आल्यावर अखेरीची बिले येण्यासही उशीर होता. मात्र, मार्च महिना तोंडावर आल्याने सर्व बिले वेळेत जमा करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांनी ४६ लाख २२ हजार ८० टन गाळप ऊस गाळप करून ५२ लाख दोन हजार ३० क्विटंल साखर निर्मिती केली आहे. या कारखान्यांचा सरासरी उतारा ११.८ टक्के आहे. तर खासगी कारखान्यांनी ५६ लाख ६३ हजार ४८४ टन ऊस गाळप करून ४८ लाख ४९ हजार १४० क्विंटल साखर निर्मिती केली. त्यांचा सरासरी साखर उतारा ८.६४ टक्के आहे. यंदा ऊस हंगामात दर लवकर निश्चित झाल्यामुळे आंदोलने झाली नाहीत. शेतकऱ्यांचा ऊस तुटल्यावर १४ दिवसांत खात्यावर बिल जमा करण्याची कायदेशीर जबाबदारी कारखान्यांची असते. मात्र हा नियम बहुतांश कारखान्यांनी पाळलेला नाही. अनेक कारखान्यांची बिले एक ते दीड महिना उशिरा दिल्याने शेतकऱ्यांचा पीक कर्ज व इतर कर्जाच्या व्याजाचा भुर्दंड शेतकऱ्यांनी सोसावा लागला आहे.


















