सातारा : जिल्ह्यातील १७ साखर कारखाने यंदाच्या हंगामात ऊस गाळप करीत आहेत. यापैकी बहुसंख्य कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस बिले थकीत ठेवली आहेत. ही ऊस बिले व्याजासह त्वरित अदा करण्याचे आदेश कारखान्यांना द्यावेत. जाणीवपूर्वक बिल थकवणाऱ्या कारखानदारांवर कठोर कारवाई करावी. अन्यथा जिल्हा प्रशासनालाही जबाबदार धरून आंदोलन केले जाईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना याबाबत निवेदन दिले. ऊस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सर्व साखर कारखान्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करून परवाने रद्द करण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू करावी अशी मागणीही त्यांनी केली.
याबाबत निवेदनात म्हटले आहे की, काही कारखान्यांनी चालू गळीत हंगामात ऊस गाळप करूनही मागील दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांची बिले मुद्दाम थकवून ठेवली आहेत. काहींनी अद्याप ऊस दरही जाहीर केलेले नाहीत. ऊस नियंत्रण कायद्यानुसार १४ दिसांत ऊस बिले अदा करणे कायदेशीर बंधनकारक असताना, संबंधित कारखाने या कायद्याला जुमानत नाहीत. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा. तसेच फलटण तालुक्यातील इतर कारखान्यांप्रमाणे जर स्वराज अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड व श्रीराम जवाहर या दोन कारखान्यांनी येत्या ४ दिवसांत प्रति टन ऊसाचा पहिला हप्ता ३२०० व दिवाळीसाठी २०० रुपये असा दर जाहीर केला नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हाधिकारी कार्यालयावर तीव्र आंदोलन करेल. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस जिल्हा प्रशासन व संबंधित साखर कारखाने जबाबदार राहतील. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, धनंजय महामुलकर, अर्जुन साळुंखे, नितीन यादव, रविंद्र घाडगे, प्रमोद गाडे, बाळासाहेब शिपुकले, महादेव डोंगरे, सतीश साळुंखे आदी उपस्थित होते.

















