सातारा : यंदा जिल्ह्यात गाळपास तब्बल एक लाख हेक्टरवरील ऊस उपलब्ध आहे. या वेळेस जिल्ह्यातील सहकारी नऊ आणि खासगी आठ असे एकूण १७ साखर कारखाने ऊस गाळप करणार आहेत. काही शेतकऱ्यांनी दोनपेक्षा जास्त कारखान्यांकडे ऊस नोंदणीचा पर्याय ठेवला आहे. शेतकऱ्यांना साखर उताऱ्यावर अंतिम दर मिळेल. जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी क्षमता वाढवलेली असल्याने पूर्ण क्षमतेने चालवून गाळप उरकण्यावर भर राहणार आहे. त्यासाठी हार्वेस्टरच्या माध्यमातून तोडणीला प्राधान्य दिले जाईल. मात्र, यात पावसाचा अडथळा येऊ शकतो. त्यामुळे कारखान्यांकडे पर्यायी तोडणी वाहतूक यंत्रणाही उपलब्ध असेल. यावर्षी साखर उताऱ्यानुसार ३२०० ते ३५०० रुपये प्रतिटनापर्यंत पहिली उचल होण्याची शक्यता आहे.
यंदा पावसाचा कालावधी वाढल्यामुळे गळीत हंगाम एक महिना उशिराने सुरू होत आहे. यावर्षी ऊस गळीत हंगामाला यावर्षी पावसाच्या लहरीपणाचा फटका बसला आहे. मध्यंतरीच्या कालावधीत संततधार पाऊस सुरू राहिल्याने उसाची चांगली वाढ झालेली नाही. त्यामुळे उत्पादनावर परिणाम जाणवणार आहे. लांबलेला पाऊस आणि शेतात तुंबलेले पाणी यामुळे हार्वेस्टरच्या वापरावर मर्यादा येणार आहेत. यावर्षी ऊस दराचा प्रश्न फारसा चर्चेला आलेला नाही. कारण केंद्र शासनाने एफआरपी वाढवून दिलेली आहे. तरीही साखर उताऱ्यानुसार यंदा ३२०० ते ३५०० पर्यंत पहिली उचल जाण्याची शक्यता आहे. यावर्षीचा अंतिम दर हा कारखान्याच्या रिकव्हरीवर कमी जास्त असेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे लक्ष पहिल्या उचलीवर असेल. यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका होणार आहेत. त्यासाठी राजकारणात सक्रिय असलेल्या नेत्यांकडून ऊस दर थोडा जादा मिळेल, अशी शक्यता आहे.