सातारा : कराड तालुक्यात गेल्या दोन ते तीन वर्षांपूर्वीपर्यंत ऊस तोडणीसाठी मोठ्या प्रमाणावर बीडसह परजिल्ह्यातील मजूर येतात. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी कारखान्याकडून ट्रॅक्टर मालकांना व्याजाने काही रक्कम उचल स्वरूपात दिली जाते. याच पैशाचा वापर करून ट्रॅक्टर मालक टोळी प्रमुखांशी अथवा ऊसतोड मजुरांशी करार करतात. त्यानंतर संबंधितांना अॅडव्हान्स रक्कम दिली जाते. मात्र, ही अॅडव्हान्स रक्कम घेतल्यानंतर अनेक टोळीप्रमुख गायब होतात. टोळीत ज्या तोडणी मजुरांचा समावेश असल्याचे कागदोपत्री नमूद असते, ते मजूर प्रत्यक्षात आपल्याला मजुरी मिळाली नसून याबाबत काहीही माहित नसल्याचे सांगत हात वर करतात. अशा पद्धतीने कराड तालुक्यातील अनेक वाहतुकदारांची फसवणूक झाली आहे.
ऊस तोडणी कामगारांच्या या फसवणुकीमुळे अनेक ट्रॅक्टर मालक अक्षरश: देशोधडीला लागले आहेत. पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल केल्यानंतरही करार करताना दिलेला पत्ता व माहिती खोटी असल्याचे समोर आल्याने अनेकदा तपासात अडचणी निर्माण होतात. त्यामुळेच तालुक्यातील ट्रॅक्टर मालकांचे लाखो रुपये ऊस तोडणी मजुरांकडे अथवा टोळी प्रमुखांकडे अडकून पडले आहेत. ट्रॅक्टरमालकांची फसवणूक झाल्यानंतर पोलिस ठाण्यात तक्रार दिली जाते. पोलिस टोळी मुकादमावर गुन्हा दाखल करून तपास सुरू करतात. काही वेळा मुकादम पोलिसांच्या हाती लागतात. मात्र, काही वेळा त्यांचा ठावठिकाणा लागत नाही. मुकादम त्यांच्या घरच्या पत्त्यांवर आढळत नाहीत. ते कोठे आहेत, त्याचाही सुगावा लागत नाही. परजिल्ह्यातील स्थानिक पोलिसांकडून सहकार्य मिळत नाही. त्यामुळे पोलिसांना तपासात अडचणी येतात.

















