सातारा : सातारा जिल्ह्यातील दोन खासगी साखर कारखान्यांनी परवाना न घेताच गाळप सुरू केले आहे. प्रचलित कायद्यानुसार, कोणत्याही कारखान्याचे गाळप सुरू करण्यापूर्वी साखर आयुक्तालयाकडून गाळप परवाना घेणे बंधनकारक केले आहे. मात्र, साखर आयुक्तांनी याबाबत दिलेल्या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत परवानगीशिवाय गाळप सुरू करणाऱ्या कारखान्यांवर कायदेशीर कारवाई, अन्यथा उसाची वाहने अडवली जातील, असा इशारा रयत क्रांती शेतकरी संघटनेने दिला आहे. याबाबत तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना निवेदन देण्यात आले. कोरेगाव तालुक्यातील ऊस पळवला जात आहे, याप्रकरणी तत्काळ कारवाई करावी,’ अशी मागणी संघटनेने केली आहे.
याबाबत रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष मधुकर जाधव, माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष देवदास जाधव, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश साबळे व प्रशांत गायकवाड यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमवेत तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांची भेट घेऊन निवेदन दिले. दरम्यान संघटनेच्या प्रतिनिधींनी साखर आयुक्त कार्यालयाकडे करण्यात आलेल्या पत्रव्यवहाराची सविस्तर माहिती दिली. परवानगीशिवाय गाळप सुरू करणाऱ्या साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांनी कठोर कारवाईचा इशारा दिला असला तरी सातारा जिल्ह्यातील खासगी साखर कारखाने गाळप करीत आहेत असे संघटनेच्या प्रतिनिधींना निदर्शनास आणून दिले.