सातारा : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या २३ महिला सभासद शेतकरी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्यावतीने आयोजित ऊस शेती ज्ञानलक्ष्मी प्रशिक्षण शिबिरासाठी रवाना झाल्या. हे प्रशिक्षण शिबिर चार दिवस चालणार आहे. शिबिरात माती परीक्षण, अधिक ऊस उत्पादनासाठी खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, खोडवा व्यवस्थापन, उती संवर्धित रोपे, बियाणे मळा, रोग व कीड नियंत्रण व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, जैविक खतांचा वापर आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.
कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळाने महिला सभासद शेतकऱ्यांना शिबिरात सहभागी होण्याची संधी दिली आहे. त्यांना अत्याधुनिक ऊस शेतीचे धडे गिरविण्याची संधी मिळणार आहे. शिबिरासाठी रवाना होणाऱ्या महिला शेतकऱ्यांना व्यवस्थापकीय संचालक बाजीराव सुतार, बहेचे मनोज पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी दादासाहेब शेळके, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील, एचआर मॅनेजर संदीप भोसले, विक्रमसिंह माने, गणेश मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.