सातारा : लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या ५२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ चेअरमन यशराज देसाई यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी उत्साहात झाला. पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई प्रमुख पाहुणे होते. कार्यक्रमास मोरणा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रविराज देसाई, जयराज देसाई, पांडुरंग नलवडे, सोमनाथ खामकर, प्रशांत पाटील, सुहास देसाई आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी ११ ज्येष्ठ ऊस उत्पादक सभासदांच्या हस्ते उसाची मोळी गव्हाणीमध्ये टाकून गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. संचालिका दीपाली विश्वास पाटील व विश्वास आत्माराम पाटील या दाम्पत्याच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली.
कारखान्यातर्फे तीन हजार रुपयांची उचल देण्याची घोषणा चेअरमन देसाई यांनी यावेळी केली. ते म्हणाले की, लवकरच पूर्ण क्षमतेने गाळप सुरू होईल. कारखाना लहान असला, तरी दराबाबत जिल्ह्यातील मोठ्या कारखान्यांप्रमाणे निर्णय घेतला आहे. सभासद शेतकऱ्यांचा विश्वास अबाधित ठेवण्यासाठी आर्थिक ताण सहन करत, कारखान्यात गळितास येणाऱ्या उसाला प्रति मे. टन ३००० रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला आहे. ऊस विकास विभागामार्फत ऊस बियाणे, खते, तोडणी आणि वाहतूक यंत्रणा यांचे नियोजन करण्यात आले आहे. पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी शासनाचे कारखान्याला सहकार्य राहील असे आश्वासन दिले.












