नवी दिल्ली : भारताचा शेजारी देश श्रीलंकेसमोरील अडचणी कमी होण्यास तयार नाहीत. आर्थिक संकटाशी झुंज देत असलेल्या श्रीलंकेत सद्यस्थितीत इंधन शिल्लक नाही. आणि इंधन खरेदीसाठी पैसेही. यामुळे या शेजारी देशाने एक आठवड्यासाठी शाळा बंद केल्या आहेत. सद्यस्थितीत हॉस्पिटल्स आणि इतर आपत्कालीन सेवांसाठी पेट्रोल, डिझेल शिल्लक ठेवणे गरजेचे असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. त्यामुळे शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. असोसिएट प्रेसच्या एका वृत्तानुसार, श्रीलंकेच्या ऊर्जामंत्र्यांनी स्पष्ट केले की, देशात फक्त अत्यावश्यक कारणांसाठीच इंधन शिल्लक आहे.
याबाबत आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, इतर देशांत राहात असेलल्या श्रीलंकेतील नागरिकांना पैसे पाठविण्यास सांगण्यात आले आहे. तरच देशात इंधन खरेदी होवू शकते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेवर प्रचंड परदेशी कर्ज आहे. त्यांना त्याचे हप्ते फेडणे कठीण झाले आहे. त्यामुळे पुरवठादारांनी क्रेडिटवर इंधन देण्यास मनाई केली आहे. सध्या देशात जो साठा शिल्लक आहे, तो आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, अन्नधान्य वितरण अशा गरजेच्या कामकाजासाठी वापरण्याइतपत आहे. श्रीलंकेचे वीज आणि ऊर्जा मंत्री कंचना विजयशेखरा यांनी सांगितले की, पैसे जमविणे हे एक आव्हान आहे. आम्ही नव्या इंधनासाठी ऑर्डर दिली आहे. ४० हजार मेट्रिक टन डिझेल शुक्रवारपर्यंत येईल. सरकार ५८७ मिलियन डॉलरचे देणे भागविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे.











