कोल्हापूर : साखर उद्योगात दिलेल्या योगदानाची दखल घेत ज्येष्ठ साखर उद्योग अभ्यासक आणि छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी कार्यकारी संचालक पी. जी. मेढे यांची भारतीय शुगरतर्फे ‘’श्री. पृथ्वीराज शिंदे बेस्ट मॅनेजमेंट पेपर अवॉर्ड” या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
भारतीय शुगरची ४९ वी वार्षिक बैठक आणि १२ वा पुरस्कार समारंभ १८ जुलै २०२५ रोजी महासैनिक दरबार हॉल (सर्किट हाऊस रोड, लाईन बाजार जवळ, कसबा बावडा, कोल्हापूर) येथे होणार आहे. यावेळी ९० हून अधिक पात्र पुरस्कार विजेत्यांना सन्मानित केले जाणार असल्याचे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. रोख ३,००० रुपये, ट्रॉफी आणि प्रमाणपत्र असे मेढे यांना मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल पी. जी. मेढे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.