मुंबई: भारत-अमेरिका व्यापार चर्चेत प्रगती आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात केली जाण्याच्या आशेने ऑटो आणि रिअल्टी शेअर्समध्ये तेजी झाल्याने मंगळवारी बेंचमार्क निर्देशांकांमध्ये मोठी वाढ झाली. सेन्सेक्स ५९४.९५ अंकांनी वाढून ८२,३८०.६९ वर बंद झाला, तर निफ्टी १६९.९० अंकांनी वाढून २५,२३९.१० वर पोहोचला.
भारत आणि यूएसने टॅरिफ-संबंधित मुद्द्यांवर चर्चा सुरू ठेवल्याने बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण आणि मध्य आशियासाठी सहाय्यक यूएस ट्रेड प्रतिनिधी ब्रेंडन लिंच चर्चेसाठी नवी दिल्लीत आहेत. १७ सप्टेंबर रोजी संपणाऱ्या यूएस फेडच्या दोन दिवसांच्या बैठकीपूर्वी जागतिक संकेत देखील सकारात्मक पाहायला मिळत आहेत. बाजारांना २५ बेसिस पॉइंट व्याजदर कपातीची अपेक्षा आहे.
क्षेत्रीय आघाडीवर, रिअल्टी शेअर्समध्ये सलग तिसऱ्या सत्रात वाढ झाली. प्रेस्टिज इस्टेट्स प्रोजेक्ट्स, द फिनिक्स मिल्स, डीएलएफ, अनंत राज आणि गोदरेज प्रॉपर्टीजमधील तेजीमुळे निफ्टी रिअॅल्टी निर्देशांक 2 टक्क्यांनी वाढला, ऑटो, मेटल आणि फायनान्शियल स्टॉक्समध्येही खरेदी दिसून आली.
याउलट, एफएमसीजी स्टॉक्समध्ये दबाव राहिला आणि निफ्टी एफएमसीजी इंडेक्स ०.३ टक्क्यांनी घसरला. निफ्टी स्मॉलकॅप १०० मध्ये १.९१ टक्क्यांनी वाढ झाली, तर निफ्टी मिडकॅप १०० मध्ये ०.६ टक्क्यांनी वाढ झाली. जीएमआर एअरपोर्ट्स आणि पर्सिस्टंट सिस्टम्स हे उल्लेखनीय मिडकॅप स्टॉक्समध्ये होते, जे ४ टक्क्यांपर्यंत वाढले. स्मॉलकॅप सेगमेंटमध्ये, रेडिंग्टन आणि गॉडफ्रे फिलिप्स इंडिया २० टक्क्यांपर्यंत वाढले.