मुंबई : इराण – इस्राइल युद्धाचे सावट भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळाले, त्यामुळेच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी २३ जून रोजी भारतीय शेअर बाजार निर्देशांक नकारात्मक पातळीवर बंद झाले. त्यामध्ये सेन्सेक्स ५११.३८ अंकांनी घसरून ८१,८९६.७९ वर तर निफ्टी १४०.५० अंकांनी घसरून २४,९७१.९० वर बंद झाला. ट्रेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स, हिंदाल्को इंडस्ट्रीज, अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट्स या कंपन्यांचे शेअर्स वधारले तर इन्फोसिस, एल अँड टी, हिरो मोटोकॉर्प, एम अँड एम, एचसीएल टेक्नॉलॉजीजमध्ये मोठी घसरण झाली.
शुक्रवारच्या ८६.५९ च्या बंदच्या तुलनेत सोमवारी भारतीय रुपया १६ पैशांनी घसरून ८६.७५ प्रति डॉलरवर बंद झाला. शुक्रवारी सेन्सेक्स १,०४६.३० अंकांनी वाढून ८२,४०८.१७ वर बंद झाला, तर निफ्टी ३१९.१५ अंकांनी वाढून २५,११२.४० वर बंद झाला होता. अमेरिकेने इराणच्या आण्विक उर्जा प्रकल्पांवर हल्ला केल्यानंतर जगभरात चिंता वाढली आहे. अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर इस्रायल-इराण संघर्षात एक नवीन आणि चिंताजनक टप्पा सुरू झाला आहे.