पुणे : साखर उद्योगाचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य आणि केंद्रातील मंत्र्यांची केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक घेऊ, असे आश्वासन वसंतदादा साखर संस्थेचे (व्हीएसआय) अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी दिले. संस्थेच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने सोमवारी (ता. २९) पवार बोलत होते. यावेळी राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, बाळासाहेब पाटील, जयप्रकाश दांडेगांवकर, बी. बी. ठोंबरे, माजी खासदार श्रीनिवास पाटील, ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू-पाटील, साखर आयुक्त डॉ. संजय कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, हर्षवर्धन पाटील यांनी साखर उत्पादन, अडीअडचणींबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “२०१७ पासून साखरेची एमएसपी वाढविण्यात आली नाही. मात्र एफआरपी दरवर्षी वाढवली जाते. यावर्षी एफआरपी ६५५ रुपयांनी वाढविल्याने उसाचे दर वाढले आहेत. त्यातच कारखान्यांमधील ऊस दर स्पर्धेमुळे एफआरपी आणि साखरेची एमएसपी यामध्ये ३०० ते ७०० रुपयांची तफावत आहे. परिणामी साखर कारखाने अडचणीत येत आहे.
केंद्र सरकारने १५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी दिली आहे. यामुळे थोडा दिलासा कारखान्यांना मिळाला आहे. मात्र आणखी १५ लाख टन साखर निर्यातीला परवानगी देण्याची गरज आहे. तसेच इथेनॉलचा कोटा ६० कोटी लिटरने वाढविण्याची गरज आहे. तरच साखर कारखाने व्यवस्थित चालतील.” या सर्व प्रश्नांवर शरद पवार यांनी मंत्री शहा यांच्यासोबत बैठक घ्यावी, अशी विनंती या प्रसंगी केली. यावर शरद पवार यांनी बैठक घेण्याचे आश्वासन दिले.राष्ट्रीय साखर संघ आणि ‘व्हीएसआय’च्या मदतीने छोटे हार्वेस्टर घेणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी सांगितले. यासाठी कर्ज, अनुदान योजना आखण्यात येईल, असेही पाटील म्हणाले. प्रास्ताविक ‘व्हीएसआय’चे विश्वस्त इंद्रजित मोहिते यांनी केले.
मुख्यमंत्र्यांसह मंत्री अनुपस्थित…
दरवर्षी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत वार्षिक सर्वसाधारण सभा होते. या वर्षी मुख्यमंत्र्यांसह सहकार, कृषी, अर्थमंत्री उपस्थित नसल्याने कार्यक्रम थोडक्यात उरकण्यात आला.महानगरपालिका निवडणुकांच्या आचारसंहितेमुळे साखर उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या साखर कारखाने, शेतकरी, संशोधक, शास्त्रज्ञ यांना देण्यात येणारे पुरस्कार वितरण करण्यात आले नाही. आचारसंहिता संपल्यावर हा सोहळा आयोजित केला जाईल, असे शरद पवार यांनी सांगितले.

















