सांगली : श्रीपती शुगर कारखान्याचे अध्यक्ष विश्वजित कदम यांनी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे मागील गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्याकडे पाठवलेल्या प्रतिटन उसाला अर्धा किलो साखर सवलतीच्या दरात वाटप सुरू केले असून, २५ ऑगस्टपर्यंत सार्वजनिक व आठवडा सुट्या सोडून साखर वाटप सुरू आहे. तेव्हा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखाना कार्यस्थळावरून साखर घेऊन जावे, असे आवाहन कार्यकारी संचालक महेंद्र लाड यांनी केले.
महेंद्र लाड म्हणाले, मागील गळीत हंगामातील ऊस तोडणी वाहतूकदार यांची तोडणी वाहतुकीची कमिशन डिपॉझिट बिलेही त्यांच्या बँक खातेमध्ये वर्ग केली आहेत. यंदाचा गळीत हंगाम आव्हानात्मक असला तरी ‘श्रीपती शुगर’वर विश्वास असणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांच्यामुळे पाच लाख टन गाळपाचे उद्दिष्ट साध्य करणार आहे.
ते म्हणाले, ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन व प्रशिक्षणासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्रास भेटीचे आयोजन ऊस शेतीमध्ये आधुनिकतेसाठी सदैव प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे जमिनीचा पोत, उतारा व वजनामध्ये आमूलाग्र बदल घडविण्यासाठी शेतकऱ्यांच्या समवेत ‘श्रीपती शुगर’ कायम अग्रेसर राहील.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही आवश्यक असल्याची बाब ओळखून ‘श्रीपती शुगर’ने कर्मचारी व शेतकरी यांचे प्रबोधन व प्रशिक्षणाचा मार्ग निवडला आहे, जेणेकरून कमी खर्चामध्ये अधिक उत्पादन वाढ होईल, खते, कीटकनाशकांचे प्रमाण खूप कमी राहण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये बदल घडवून विकास करून घ्यावा. ‘श्रीपती शुगर’ची नेहमीच साथ राहील, असे आवाहन कार्यकारी संचालक महेंद्र लाड यांनी केले. यावेळी ‘भारती शुगर्स’चे अध्यक्ष ऋषिकेश लाड, सरव्यवस्थापक महेश जोशी, शेती अधिकारी सतीश मिरजकर, एच. आर. रणजित जाधव, यशवंत जाधव, दीपक वाणी, आनंदा कदम आदी उपस्थित होते.