सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून सुरू झालेला हंगाम सुरळीत सुरू असून, लवकरच गाळपाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. चालू गळीत हंगामात १६ नोव्हेंबरअखेर १४,३१,७६४ मेट्रिक टन ऊस गाळप झाले असून ९,८१,२७५ क्विंटल साखर तयार झाली आहे. हंगामात गाळप करणाऱ्या जिल्ह्यातील ३३ पैकी १६ साखर कारखान्यांनी साखर आयुक्तालयाकडे दैनंदिन अहवाल सादर केले. यात ८ सहकारी आणि ८ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. यात सहकारी कारखान्यांनी एकूण ९,७७,१२४ टन ऊस गाळप करून सरासरी ७ टक्के उताऱ्याने ६,८४,४०५ क्विंटल साखर उत्पादित केली. तर खासगी कारखान्यांनी ४,५४,६४० टन ऊस गाळप करून सरासरी ६.५५ टक्के उताऱ्याने २,९६,८७० क्विंटल साखर तयार केली आहे.
सद्यस्थितीत पिंपळनेर येथील विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने या वर्षी गाळप व साखर उत्पादनात आघाडी घेत तीन लाख टन ऊस गाळपाचा टप्पा गाठला आहे. सहकार महर्षी, विठ्ठल (वेणूनगर), पांडुरंग या तीन कारखान्यांनी दीड लाख टनांहून अधिक गाळप केले आहे. तर करकंब येथील विठ्ठलराव शिंदे कारखान्याने एक लाख टनांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यात साखर उताऱ्याची स्थिती समाधानकारक असली, तरी काही खासगी कारखान्यांचा गाळप वेग मंदावल्याचे चित्रही दिसत आहे. आगामी काळात गळीताला जोर येईल. तसेच आणखी काही कारखाने गाळप सुरू करतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.


















