सोलापूर : चालू गळीत हंगामात विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याने जिल्ह्यात ऊस गाळपात आघाडी घेतली आहे. केवळ ऊस गाळपातच नव्हे तर दर दहा दिवसाला ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जात आहेत. कारखान्याचे युनिट क्रमांक एक पिंपळनेर व युनिट क्रमांक २ करकंब यामधून आतापर्यंत एकूण १५ लाख ७६ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. शेतकऱ्यांची प्रती टन १७५ रुपये या दराने फरक बिलेही देण्यात येत असल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार बबनराव शिंदे यांनी दिली. कारखान्याने १० जानेवारीअखेर ऊस बिलासाठी एकूण ४२२ कोटी ४५ लाख शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
चेअरमन शिंदे म्हणाले की, कारखान्याच्या दोनही युनिटमध्ये गाळप हंगाम गतीने सुरू आहे. पिंपळनेर युनिटकडे सरासरी प्रतिदिन १४,७०० मे. टन तर करकंब युनिटकडे सरासरी ५,००० मे. टनापेक्षा जादा ऊस गाळप होत आहे. पिंपळनेर युनिटमध्ये ११,७४,३५९ मे. टन तर करकंब युनिटमध्ये ४,०२,६०३ मे. टन असे एकूण १५,७६,९६२ मे. टन ऊस गाळप झालेले आहे. कारखान्याने १ ते १० जानेवारी या दहा दिवसांचे प्रति टन ३०२५ रुपयांप्रमाणे पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला आहे. ऊस बिलापोठी कारखान्याने ५७ कोटी रुपये अदा केलेले आहेत. गेली चार वर्षे कारखाना दहा दिवसाला ऊस बिले देतो. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.

















