सोलापूर : जिल्ह्यात यंदाच्या गळीत हंगामात सुरू असलेल्या ३२ साखर कारखान्यांपैकी निम्म्या, म्हणजेच १६ साखर कारखान्यांनी उसाचा दर जाहीर केला आहे. मात्र, उर्वरित १६ कारखान्यांनी ऊस दर अद्याप जाहीर केला नाही. बहुतांश साखर कारखान्यांनी सरासरी २,८०० रुपयांप्रमाणे ऊस दर जाहीर केला आहे. हा ऊस दर न परवडणारा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. रासायनिक खतांचे वाढलेले दर, वाढती मजुरी, ट्रॅक्टर-बैलाचे वाढलेले भाडे, पाणीपट्टी यांचा हिशोब घातला तर पहिली उचल किमान ३,४०० ते ३,५०० रुपये मिळावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. गेल्यावर्षी कारखानदारांनी २,८०० ते २,९०० रुपये दर दिला. यंदाही तसाच दर जाहीर झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे साखर कारखानदारांविरोधात संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
ऊस दराबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे म्हणाले की, चालूवर्षी उसाला पहिली उचल ३ हजार ४०० रुपये मिळावी म्हणून आम्ही यापूर्वी प्रत्येक साखर कारखाना प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन दिले आहे. गेल्या दोन दिवसांपासून आम्ही प्रत्येक साखर कारखान्यावर जाऊन आंदोलन करीत आहोत. आमच्याशी चर्चा नाही केली तर आम्ही गव्हाण बंद पाडू. मोहोळ येथील शेतकरी हिरालाल टेकळे यांनीही अशाच भावना व्यक्त केल्या. कारखानदारांनी उसाचा दर शेतकऱ्यांना वाढवून दिला पाहिजे. शेतकरी खूप आर्थिक अडचणीत आहे. उत्पादन खर्च वाढूनही उसाचा प्रति टन दर तोच आहे. बाजारात बाजारात साखरेला दर ही चांगला आहे. तरीही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आहे.


















