सोलापूर : ऊस वाहतूक व्यावसायिकांना ऊस तोडणीसाठी ऊस तोडणी मजूर पुरवतो म्हणून वेळोवेळी तब्बल २८ लाख रुपये घेऊन गंडा घालणाऱ्या जयसिंह राजेसिंह माळचे (रा. वासदरे जि. नंदुरबार) या मुकादमाला करमाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यास बार्शी सत्र न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पहिल्या गुन्ह्यात ज्ञानेश्वर मारकड (रा. उमरड, ता. करमाळा) यांनी फिर्याद दिली होती तर दुसऱ्या गुन्ह्यामध्ये शंकर दिगंबर मारकड (रा. उमरड, ता. करमाळा) यांनी करमाळा पोलिसात फिर्याद दिली होती.
पहिल्या घटनेत आरोपीने करार करून १४ लाख रुपये घेऊन मजूर न देता गंडविले होते. दुसऱ्या घटनेत आरोपीने ५४ मजूर पुरवतो म्हणून १४ लाख रुपये घेतले होते, असे दोन्ही गुन्ह्यांतील जवळपास २८ लाख रुपये घेऊन संशयित आरोपीने एकही मजूर ऊसतोडणीसाठी दिला नाही. करमाळा पोलिसांनी जयसिंह माळचे विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करून बार्शी सत्र न्यायालयाच्या समोर उभा केले असता सत्र न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.