सोलापूर : चालू हंगामात राज्यात ९७ सहकारी व ९८ खासगी असे एकूण १९५ कारखाने ऊस गाळप करीत आहेत. राज्यात एक जानेवारीअखेर ५६२ लाख टन ऊस गाळप झाले असून, ४९२ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ८.७५ टक्के आहे. गतवर्षीच्या तुलनेत तो ०.१७ टक्क्यांनी अधिक आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील ३३ साखर कारखान्यांमध्ये आतापर्यंत ९२ लाख ३१ हजार ७२८ मे. टन उसाचे गाळप केले आहे. एकूण ७६ लाख २० हजार ४९० क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा ८.२५ टक्के आहे.
जिल्ह्यातील ऊस गाळपात पिंपळनेरचा विठ्ठलराव शिंदे कारखाना आघाडीवर आहे. कारखान्यात नऊ लाख १४ हजार ७९६ टन ऊस गाळप झाले आहे. गाळपात खासगी कारखानेच अव्वल क्रमांकावर असल्याचे दिसते. पंढरपूरच्या विठ्ठल कारखान्याने सहा लाख, पांडुरंग व सहकार महर्षी कारखान्याने पाच लाख टन गाळपाचा टप्पा पार केला आहे. जयहिंद कारखान्याने चार लाख टन गाळप पूर्ण केले असून बबनरावजी शिंदे व व्ही. पी. शुगर्स हे कारखाने चार लाख टन गाळपाच्या उंबरठ्यावर आहेत. मात्र, जिल्ह्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेच्या निम्मेच गाळप कारखान्यांमध्ये होत असल्याचे दिसून येत आहे. अनेक साखर कारखान्यात पूर्ण क्षमतेने गाळप होत नाही. सर्व ३३ कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता एक लाख ६१ हजार मे. टन आहे. याऊलट एक जानेवारी रोजी ८२ हजार ३८३ टन उसाचे गाळप झाले.

















