सोलापूर : ऊस लागवड कमी होऊ लागल्यामुळे राज्यातील कारखानदार लॉबी पुढे सरसावली आहे. ही लॉबी शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर केळी रोपे मिळू नये, जिल्ह्यात कोल्ड स्टोरेज वाढू नये, यासाठी प्रयत्न करीत आहेत, असा आरोप शिवसेनेचे माढा लोकसभेचे संपर्क प्रमुख संजय कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत केला. सोलापूर जिल्ह्यातील केळीची आखाती देशात मोठ्या प्रमाणात निर्यात वाढली आहे. मात्र, काही बड्या कारखानदारांना पचनी पडत नसल्याने ते केळी लागवड कमी व्हावी म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत असे ते म्हणाले. याप्रश्नी ५ जानेवारी रोजी टेंभुर्णीत केळी व्हेंडर व केळी पीक संबंधित उद्योजकांची बैठक आयोजित केल्याची माहिती कोकाटे यांनी दिली.
याबाबत कोकाटे यांनी सांगितले की, टिश्यू कल्चर रोप पुरवठा कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. फक्त सोलापूर जिल्ह्यातील कोल्ड स्टोरेजचे अनुदान बंद करण्यात आले आहे. देशात सर्वात जास्त सोलापूर जिल्ह्यातून ६४ टक्के केळी निर्यात होतात. उलट उष्ण कटिबंधातील केळी जास्त टिकाऊ असल्याने आखाती देशात सोलापूर जिल्ह्यातील केळीस चांगली मागणी आहे. दरही चांगला मिळत आहे. त्याला पाठबळ न देता अतिरिक्त उत्पादन वाढले नसताना केळीचे जाणून-बुजून दर पाडले जात आहेत. कारखानदार लॉबी सरकारच्या माध्यमातून मुद्दाम अडवणूक करीत आहे. शेतकऱ्यांना व्हाया आंध्र प्रदेश केळीची रोपे महाग घ्यावी लागत आहेत. सरकारने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप कोकाटे यांनी केला.

















