सोलापूर : जिल्ह्यातील साखर कारखानदारासाठी येणारा हंगाम सुगीचा ठरणार आहे. साखर संचालनालयाकडील अहवालानुसार जिल्ह्यात यावर्षी २ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र तोडणीसाठी उपलब्ध आहे. गेल्यावर्षी हेच क्षेत्र सव्वा लाख हेक्टर होते. मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध झाल्यामुळे साखर कारखानदारांना तोडणी यंत्रणा प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे. जास्त ऊस उपलब्ध असल्यामुळे तोडणी यंत्रणा राबवताना कारखान्यांची कसरत होणार आहे.
जिल्ह्यात गेल्यावर्षी, सन २०२४-२५ या हंगामामध्ये ३९ कारखान्यापैकी ३३ कारखान्यांनी गाळप केले. या कारखान्यांनी एकूण १,२८,४०८ हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळप केला. यावर्षी जिल्ह्यात २,१२,८७ हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. यातील आडसाली उसाचे क्षेत्र जवळपास ३० हजार हेक्टर तर पूर्व हंगामी ऊस ३५ हजार हेक्टर क्षेत्र तोडणीसाठी उपलब्ध आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत मुबलक ऊस उपलब्ध असल्याचे चित्र आहे. गेल्यावर्षी कित्येक कारखान्याचे हंगाम जानेवारी महिन्यातच आटोपले. यंदा मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असल्यामुळे कारखान्याचा हंगाम दीर्घकाळ चालेल. दोन वर्षांपासून उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरत असल्यामुळे तसेच आधुनिक लागवड तंत्रज्ञानामुळे एकरी उत्पादनात वाढ झाली आहे. मात्र, ऊस तोडणीच्या काळात शेतकऱ्यांची लूट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.